MNS Video Viral: ठाण्यातील कळवा रेल्वे स्टेशनवर झालेला किरकोळ वाद थेट मनसेच्या कार्यालयात पोहोचला. यानंतर ज्या अमराठी महिलेबरोबर वाद झाला, तिला माफी मागण्यास सांगितले गेले. सदर महिलेने माफी मागितल्यानंतरही तिच्या कानशिलात लगावण्यात आली.
या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. सदर व्हिडीओ मनसेचे पदाधिकारी विनायक बिटला यांच्या फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. मात्र या व्हिडीओवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत असून काहींनी याला पाठिंबा दिला आहे तर काही जणांनी यावर टीकाही केली आहे.
विनायक बाटला यांच्या कार्यालयातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कळवा स्थानकावर घडलेला प्रसंग कथन करते. तसेच माझ्याकडून चुकून अपशब्द काढले गेले, मी हात उचलण्याचा प्रयत्न केला, असेही कबूल करते. सदर कृत्याबाबत ती दिलगिरी व्यक्त करते, त्यानंतर बाजूलाच बसलेली मनसेची महिला पदाधिकारी त्या महिलेच्या कानशिलात लगावते.
नेमके प्रकरण काय?
मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधून उतरताना मनसेच्या पुरूष कार्यकर्त्याचा चुकून सदर महिलेला धक्का लागला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.
पुरूष कार्यकर्त्याने धक्का लागल्याबद्दल माफी मागितली. मात्र तरीही संबंधित महिलेने वाद घालून अपशब्द वापरले, मराठी लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला गेला.
या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्याच्या पत्नीने यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी विनंती केल्यामुळे सदर प्रकरण मनसे कार्यालयात पोहोचले. तिथे या महिलेला कानशिलात लगावण्यात आली.
पाहा व्हिडीओ –