HSC SSC Board Exam 2026:दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी आता परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे झाले आहेत. राज्य मंडळाने यावर्षीपासून ही नवीन नियमावली लागू केली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची सुविधा नसेल, त्यांना मान्यता मिळणार नाही. विद्यार्थी सुरक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक विभागीय मंडळ या संदर्भात तपासणी करत आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान किती परीक्षा केंद्रांवरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यन्वित आहे, याची चाचपणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत सुरू केली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा उपलब्ध असेल, त्या केंद्रांनाच मान्यता दिली जाणार असल्याचे नाशिक विभागीय मंडळामार्फत सांगण्यात आले.
राज्य मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांसाठी मार्गदर्शक बैठका आयोजित केल्या जात आहेत. मंडळामार्फत त्यासाठीची आवश्यक ती माहितीही मागविण्यात आली आहे. याबाबत यंदा मंडळामार्फत परीक्षा केंद्रावरील परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्हीची सुविधा आहे की, नाही यावर अधिक भर दिला जात आहे.
मंडळामार्फत परीक्षेसंदर्भात घेतल्या जात असलेल्या बैठकांदरम्यान परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना सुरक्षाविषयक विविध माहिती सादर करावी लागत आहे. परीक्षा केंद्राचे नाव, विद्यार्थी संख्या केंद्रावरील वर्ग खोल्या, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह, अग्निशमन यंत्रणा याचा तपशील परीक्षा केंद्रांना द्यावयाची आहे. यासोबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्येचे मुद्दाही मंडळामार्फत अधिक गांभीर्याने घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांची पुढील आठवड्यांत घोषणा होणार! तयारीला लागा Maharashtra ZP Election 2025
राज्य सरकारने १३ मे २०२५ ला जाहीर केलेल्या शासन अध्यादेशानुसार, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे बंधनकारक आहे. त्यानुसार यंदा परीक्षागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक करण्यात आल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले. गेल्या दहावी-बारावीच्या वर्षीही परीक्षांदरम्यान हा मुद्दा पुढे आला होता. परंतु, त्यावेळी हे बंधनकारक करण्यात आलेले नव्हते. यंदा मात्र शासन अध्यादेशानुसार परीक्षागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत.
विद्यार्थी सुरक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे परीक्षागृहात सीसीटीव्ही कॅमेरा या वर्षांपासून बंधनकारक केलेला आहे. त्यानुसार परीक्षा केंद्रांनी अन्य सुविधांसह ही सुविधाही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा नसल्यास संबंधित परीक्षा केंद्राला मान्यता दिली जाणार नाही.
– डॉ. सुभाष बोरसे, अध्यक्ष, नाशिक विभागीय मंडळ