महानगरपालिका निवडणूक मतदार याद्यांसंदर्भात निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे पत्रक जारी Maharashtra Voter List New Update 2025

Maharashtra Voter List New Update 2025:महानगरपालिका निवडणूक मतदार याद्यांसंदर्भातील तक्रारी संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल कराव्यात

मुंबई, दि. २२ (रानिआ): महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर करण्यात आले असून, त्याबाबत हरकती व सूचना किंवा काही तक्रारी असल्यास त्या २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत.

 

या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

त्यातील आपले नाव https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर शोधता येईल. त्यावर २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इ. स्वरूपाची कार्यवाही केली जात नाही.

मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकांसंदर्भात; तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment