MSRTC Recruitment 2025:महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळात वाहकांची ३ हजार ७३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत वाहकांना डबल ड्युटी करावी लागत असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे, याचा बस फेऱ्यांवर परिणाम होऊन प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्यात एसटी महामंडळाची ५८० बसस्थानके असून, या बसस्थानकांमध्ये प्रवाशांना योग्य सुविधा देण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. मात्र वाहकांची ३ हजार ७३० पदे रिक्त असल्याने आगार व्यवस्थापक, प्रमुखांना दैनंदिन फेऱ्यांचे नियोजन करणे कठीण होते.
अशात वाहकांना डबल ड्युटी द्यावी लागत असल्याने फेऱ्या उशिराने धावतात, तर कधी कधी त्या रद्दही होतात. त्याचा परिणाम, एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. यामुळे प्रवाशांनाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. कार्यरत वाहकांवरही अनेकदा डबल ड्युटीचा ताण येतो.
एक कामगिरी पार पाडल्यानंतर लगेच दुसऱ्या कामगिरीवर चढणे, त्यांना शक्य होत नाही. परिणामी, नियोजित फेऱ्यांना बराच विलंब होतो..