Team India Squad ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. गतविजेता भारतीय संघ ही स्पर्धा होस्ट करणार आहे. या स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना ८ मार्चला खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला होता.
आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान शनिवारी (२० डिसेंबर) बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातून शुबमन गिलची सुट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. यासह दुखापत हे देखील प्रमुख कारण आहे.
त्यामुळे संजू सॅमसन टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसू शकतो. यासह रिंकू सिंगला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या इशान किशनला देखील या संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी दिली गेली आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी संघाचा भाग असलेल्या जितेश शर्माला संघाबाहेर करण्यात आलं आहे.
या स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यांचं वेळापत्रक
७ फेब्रुवारी – भारत विरुद्ध अमेरिका, मुंबई
१२ फेब्रुवारी – भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली
१५ फेब्रुवारी, भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो
१८ फेब्रुवारी, भारत विरुद्ध नेदरलँड, अहमदाबाद.
असे आहेत ४ गट
अ गट – भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, नामिबिया.
ब गट – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि ओमान.
क गट – इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली.
ड गट – न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई.
या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).