बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जमावाकडून मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल; रॉ एजंट असल्याच्या संशयावरून…Again Hindu Man Assaulted in Bangladesh

Again Hindu Man Assaulted in Bangladesh: बांगलादेशमधील बंडखोर नेता शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारात एका हिंदू तरूणाची जमावाने हत्या केली. टेक्सटाईल कारखान्यात काम करणाऱ्या दीपू चंद्र दास नावाच्या कामगाराला मारहाण करून जमावाने झाडाला बांधून जाळले. दीपू चंद्र दासवर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये हिंदू व्यक्तीला मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक यंत्रणेच्या दाव्यानुसार सदर घटना बांगलादेशच्या खुलना विभागातील झेनाइदाह जिल्ह्यात घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेची माहिती अद्याप अधिकृत करण्यात आलेली नाही. पीडित व्यक्तीचे नाव गोबिंदा बिस्वास असून तो रिक्षाचालक आहे. त्याच्या मनगटावर लाल धागा बांधल्याचे पाहिल्यानंतर स्थानिकांनी त्याच्याशी हुज्जत घातली आणि मग मारहाण केली.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

बांगलादेशमधील शोधपत्रकारिता करणारे मुक्त पत्रकार शहीदुल हसन खोकोन यांनी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला? किंवा त्यातील घडलेली घटना ताजी आहे का? याची खातरजमा प्रमुख माध्यमांनी किंवा बांगलादेश सरकारने अद्याप केलेली नाही.

मुक्त पत्रकार शहीदुल हसन खोकोन यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, बिस्वास हा भारतातील गुप्तचर संस्था रिसर्च अँड एनालिसिस विंगशी (RAW) निगडित असल्याची अफवा पसरली. ही अफवा पसरल्यानंतर काही लोक त्याच्याजवळ जमले.

झेनाइदाह महानगरपालिकेच्या गेटजवळ आणून बिस्वासला काही लोक मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले दिसतात. यानंतर पोलीस जमावाच्या तावडीतून बिस्वासला बाजूला नेताना दिसत आहेत. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आणि छातीवर जखम झाल्याचे दिसत आहे.

कथित व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बिस्वास पोलिसांकडे मदतीची याचना करत आहे. तो एक सामान्य रिक्षाचालक असल्याचे पोलिसांना सागंतो. तसेच त्याला सोडून देण्याची विनंती पोलिसांकडे करतो. त्यानंतर त्याला झेनाइदाह सदर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी मैमनसिंग येथे भारतीय कामगार दीपू चंद्र दासची हत्या झाल्यानंतर बांगलादेशमधील वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेमुळे अल्पसंख्याकांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. यापूर्वीही हिंदू अल्पसंख्यांकावर हल्ले झाले होते. त्यावेळी भारताने या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला होता.

Leave a Comment