State Employees Shasan Nirnay:अनुकंपा तत्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असतांना विविध आदेश विचारात घ्यावे लागत असल्याने अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरुपात मिळावेत यास्तव सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा नियुक्ती धोरणाचे यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करुन वाचा येथील दिनांक १७ जुलै, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये “अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण तयार केले आहे.
सदर शासन निर्णयातील अ.क्र. (IX) (४) मध्ये सदर शासन निर्णय हा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असून, निम्न शासकीय कार्यालये/स्थानिक स्वराज्य संस्था/शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे अथवा प्राधिकरण यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही.
त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा योजना लागू करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरुन स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील, असे नमुद केले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत.
त्यामुळे उपरोक्त वाचा येथील शासन निर्णय जिल्हा परिषदांतील कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही. सबब, सदर शासन निर्णयातील तरतुदीमध्ये अंशतः बदल करुन सदर धोरण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा येथील दि. १७ जुलै, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लागू करण्यात आले आहे. उक्त शासन निर्णयामध्ये खालील प्रमाणे बदल करुन सदर शासन निर्णयातील उर्वरित सर्व तरतूदी जशा आहेत तशा सर्व जिल्हा परिषद गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत.