दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू.Ahilyanagar Leopard Attack

Ahilyanagar Leopard Attack : वडील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले, तर आजी गवताचा भारा घेऊन गोठ्यात गेली. नेमकी हिच संधी साधत बिबट्याने दरवाज्यात उभ्या असलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं.

राज्यभरात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आणि त्याच्या हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अहिल्यानगरमध्येही तशीच एक बातमी समोर आली असून बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना घडली. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या गावात ही धक्कादायक घटना घडली.

शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दारात उभ्या असलेल्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याला जागेवरच ठार केलं. या घटनेनंतर चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचं चित्र होतं.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षाचा चिमुकला सिद्धेश कडलग हा घराच्या दारात उभा होता. सिद्धेश एकटा असल्याची संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याला जागेवरच ठार केले. यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला.

Ahilyanagar Leopard Attack : पारनेरमध्ये चार बिबटे जेरबंद

अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात पिंपरी गवळी गावात चौथा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. 2 डिसेंबरला पारनेर तालुक्यातील किन्ही गावातील वयोवृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पारनेर तालुक्यातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं.

Beed Leopard : बीडमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

बीड तालुक्यातील लिंबागणेश गाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला. बिबट्याचा मुक्त संचार पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आह. मध्यरात्रीच्या सुमारास एका वाहन चालकाने लिंबागणेश परिसरात आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार कैद केला. बिबट्या शेतशिवारात वावरत असतानाची दृश्यं आता समोर आली आहेत.

Nashik Leopard : नाशिकमध्ये ग्रामस्थांचा संताप

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी परिसरात बिबट्या विहिरीत पडलेला आढळला. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर वनखात्याला बिबट्याला पकडण्यात यश आलं. मात्र त्या बिबट्याला विराणे वनहद्दीत सोडण्याच्या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला.

बिबट्याला विराणे परिसरात सोडल्यास नागरिकांच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत विराणे ग्रामस्थांनी खाकुर्डी–साक्री महामार्गावर रास्ता रोखून आंदोलन केलं. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं.

Leave a Comment