Prafull Patel NCP President:राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केलेल्या विधानानंतर खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिलीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याचं विधान केलंय. या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. पियूष गोयल यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झालीय का असा प्रश्न विचारला असता सुनील तटकरे यांनी सांगितलं की, असं काही झालं नाहीय. पियूष गोयल काय म्हणाले ते मी ऐकलं नसल्याचंही तटकरेंनी स्पष्ट केलं. पियूष गोयल यांनी पीटीआयशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत विधान केलं होतं.
राज ठाकरेंनी पटेल नाही तर पाटील अध्यक्ष असावा असं ट्विट केलं होतं. राज ठाकरेंनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय करू असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं होतं. भाजपने आम्हाला नेहमीच सहकार्य केलंय. याआधीही त्यांच्याकडून सौहार्दाने आणि सन्मानाने वागणूक दिली आहे असंही सुनील तटकरे म्हणाले होते.
काय म्हणाले पियूष गोयल?
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे. राष्ट्रवादीचं नेतृत्व आधी अजित पवारांसोबत होतं आता सुनेत्रा पवारांसोबत आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आलीय. शरद पवारांना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आमंत्रण दिलं जाईल याची शक्यता कमी आहे. त्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय. पिंपरी चिंचवडमद्ये त्यांचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आलंय. अजितदादा महायुतीसोबत असते तर पुणे-पिंपरी चिंचवडच्या विजयाचा ते भाग असते.